Saturday 25 June 2016

भाजपाविरोधक आक्रमक

भाजपाविरोधक आक्रमक
पुणे : स्मार्ट सिटीच्या निमंत्रण पत्रिकेतून महापौरांचे नाव वगळणे... कार्यक्रमामध्ये स्वागतपर बोलण्याची संधी न देणे... महापौरांना कार्यक्रमाचे पास दिल्यास ते समाजकंटकांपर्यंत पोहतील असे वातावरण करून त्यांना पास न उपलब्ध करून देणे... लोहगाव विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत करण्यास महापौरांना मनाई करणे अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक नगरविकास मंत्रालयाकडून महापौरांना देण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी केली. महापौरांपाठोपाठ काँग्रेस
, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांनीही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्मार्ट सिटी योजनेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीतील १४ प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येत आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाचे आयोजन करताना महापौर तसेच इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे भाजपाने हा कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका सर्व स्तरांतून करण्यात येत होती. या पार्र्श्वभूमीवर महापौर तसेच भाजपा वगळता सर्वच पक्षांनी स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या कार्यपद्धतीचा तीव्र निषेध राजकीय पक्षांनी केला आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘लोहगाव विमानतळावर जाऊन ४० लाख पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी स्वागत करणार आहे; मात्र स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. स्मार्ट सिटीच्या निमंत्रणपत्रिकेमध्ये महापौरांचे नाव टाकण्यात आले नाही. या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका एका शिपायामार्फत माझ्याकडे पाठवून देण्यात आली. महापौरपदासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटोकॉलचे यामध्ये पालन करण्यात आले नाही. कार्यक्रमामध्ये स्वागतपर बोलण्याची संधीही नाकारण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला.’’

No comments:

Post a Comment