Wednesday, 6 July 2016

गुरूच्या कक्षेत नासाचे अंतराळयान

मियामी - सौरमालेतील सर्वांत मोठा ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरूचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपित केलेले "जुनो‘ हे अंतराळयान आज गुरू ग्रहाच्या कक्षेमध्ये पोचले आहे. "नासा‘च्या संशोधकांचे हे मोठे यश गुगलच्या सर्च इंजिनने एक खास डुडल तयार करून साजरे केले. नासाच्या "कॅलिफोर्नियातील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी‘ या संस्थेमधील जेट "प्रॉपल्शन लॅबरॉटरी‘ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार "जुनो‘ने मागील पाच वर्षांत 1.7 अब्ज किलोमीटरचा प्रवास करून गुरू ग्रहाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला आहे. अवकाशातील गुरू ग्रह म्हणजे नैसर्गिक वायूचा गोळा होय, त्याचे आकारमान पृथ्वीपेक्षा तीनशे पटीने अधिक आहे. या ग्रहावरील तीव्र किरणोत्सारी भागाचा अभ्यास करणे हा या अंतराळयानाचा मुख्य उद्देश आहे. हे अंतराळयान गुरूच्या पृष्ठभागाची छायाचित्रे टिपण्याबरोबर या ग्रहाची माहितीदेखील संकलित करेल, यामुळे सौरमालेचा इतिहास समजण्यास मदत होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. गॅलिलिओनंतर गुरूच्या कक्षेमध्ये पोचलेले जुनो हे दुसरे अंतराळयान आहे.

No comments:

Post a comment