Saturday, 9 July 2016

परदेशी क्रिकेट संघांची बांगलादेशवर फुली

बांगलादेशची राजधानी ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानप्रमाणेच परदेशी संघ क्रिकेट खेळण्यासाठी बांगलादेशात जाण्यास नकार देतील, अशी भीती आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे (आयसीसी) माजी अध्यक्ष एहसान मानी यांनी व्यक्त केली आहे.ढाक्यात दहशतवाद्यांनी २० परदेशी नागरिकांना ठार मारल्यामुळे भविष्यात परदेशी क्रिकेट संघ बांगलादेशात खेळण्यास पाकिस्तानप्रमाणेच नकार देतील अशी शक्यता मानी यांनी व्यक्त केली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर या दहशतवादी घटनेचे सावट असेल.मानी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, ढाक्यात घडलेल्या या घटनेनंतर पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशलाही परदेशी क्रिकेट संघांचे मन वळविण्यात अडचणी येणार आहेत. गेल्या काही वर्षांत बांगलादेशातील दहशतवादी घटनांमुळे बांगलादेश क्रिकेटला मोठा धक्का बसू शकेल. एकूणच आगामी दौऱ्यासाठी इंग्लिश संघाचे मन वळविणे बांगलादेशला सोपे जाणार नाही.मानी म्हणाले की, बांगलादेशातील दहशतवादी घटनेनंतरही जर बांगलादेश क्रिकेट बोर्ड परदेशी क्रिकेट संघांनी तेथे खेळावे म्हणून त्यांचे मन वळविण्यात यशस्वी ठरले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल. कारण २००९मध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान परदेशी क्रिकेट संघांचे मन वळविण्यात यशस्वी ठरलेले नाही.

No comments:

Post a Comment