मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेला राज्य मंत्रिमंडळ विस्तारातही केवळ दोन राज्यमंत्रिपदांवर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद वाढवून मिळावे, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून केली, पण मंत्रिपदाबाबत आधीच सूत्र ठरलेले असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देण्यास नकार दिला. सदाभाऊ खोत व महादेव जानकर हे मित्रपक्षाचे दोघेही राज्यमंत्री असतील.मुख्यमंत्र्यांकडून नकार येताच नरमाईची भूमिका घेत ‘शिवसेना उद्याच्या विस्तारात सहभागी होईल आणि आमचे दोन नेते मंत्री होतील’, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री जाहीर केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील २१ महिन्यांच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार शुक्रवारी सकाळी ९ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्यात भाजपाचे सहा, शिवसेनेचे दोन आणि मित्रपक्षांचे दोन, असे दहा मंत्री असतील. संभाव्य मंत्र्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर, सोलापूर ग्रामीणचे आमदार सुभाष देशमुख, निलंग्याचे (जि. लातूर) संभाजी पाटील निलंगेकर, सिंदखेडाचे (जि. धुळे) जयकुमार रावल, यवतमाळचे मदन येरावार आणि डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण या भाजपा विधानसभा सदस्यांचा समावेश असेल. शिवसेनेकडून जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील व जालनाचे आमदार अर्जून खोतकर यांना संधी मिळणार आहे. तर मित्रपक्षांपैकी राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना स्थान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरलेल्या बुलडाणा जिल्ह्यातून शेवटी भाऊसाहेब फुंडकर यांचा नंबर लागला आहे. तेथे सातत्याने विधानसभेत निवडून येत असलेले मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती आणि जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे यांची संधी हुकली आहे. सुभाष देशमुख यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्याला दुसरे मंत्रीपद मिळत आहे. याच जिल्ह्यातील विजय देशमुख हे सध्या राज्यमंत्री आहेत.
Friday, 8 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment