दक्षिण आफ्रिका ही सत्याग्रहाची जन्मभूमी आहे. याच जागेने मोहनदास यांचे महात्म्यात रूपांतर घडवले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका हा महात्मा गांधींच्या अगदी हृदयाजवळचा विषय होता,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नरेंद्र मोदी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आफ्रिकेतील भारतीय समुदायाशी जोहान्सबर्गमधील कार्यक्रमात संवाद साधला.जुलै १९१४मध्ये या देशाचा निरोप घेताना ही पवित्र भूमी आपल्याला मातृभूमीसमान असल्याचे गांधीजी म्हणाले असल्याचीही आठवण त्यांनी करून दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या समाजाची वीण समृद्ध करण्याचे काम हिंदी, तमिळ, गुजराती, उर्दू आणि तेलुगू या भाषा करत असल्याचेही मोदी म्हणाले.'दहशतवादाचा धोका जगाच्या सर्व भागांत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असुरक्षित झाले आहेत. दहशतवादाविरोधात एकजूट करणे आवश्यक आहे,' असे मत मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांच्यासोबत युनियन बिल्डिंगमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी ही चिंता व्यक्त केली. झुमा आणि मोदी यांच्यामध्ये या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली. 'संरक्षण, उत्पादन, खाण उद्योग, खनिज उद्योग आदी क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करण्यात येणार आहे,' असे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले. प्रदेश आणि जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात लढण्यासाठी दोन्ही देशांना दक्ष राहावे लागेल. तसेच सहकार्य वाढवावे लागेल, या मुद्द्यावर झुमा यांनी सहमती दर्शवल्याचेही मोदी म्हणाले.मोझांबिकहून मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले आहेत. युनियन बिल्डिंगमध्ये त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष जेकब झुमा यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.'हा दौरा म्हणजे महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना आदरांजली वाहण्याची संधी आहे,' असे मोदी म्हणाले. Saturday, 9 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment