Saturday, 9 July 2016

मुम्बा अव्वल क्रमांकावर

अनुभव आणि कौशल्यपूर्ण खेळ या जोरावर सामना एकहाती खेचून आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, हे अनुपकुमारने शुक्रवारीदेखील दाखवून दिले. रिशांक देवाडिगासारखा चढाईपटू व जीवाकुमारसारखा बचावातील मोहरा अपयशी ठरूनही यू मुम्बाने शुक्रवारी प्रो कबड्डी लीगमधील झुंजीत पिछाडी भरून काढत बेंगळुरू बुल्सवर २४-२३ असा निसटता विजय मिळवला. यू मुम्बाने या विजयासह अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.
सातपैकी चार झुंजी जिंकणाऱ्या मुम्बाच्या खात्यात २२ गुण जमा आहेत. थंड डोक्याने खेळ करत कर्णधार अनुपने मुम्बाला तारले.सुरुवातीला बेंगळुरूने राखलेले वर्चस्व, उत्तरार्धात यू मुम्बाने लावलेला जोर आणि अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेले द्वंद्व असे चढउतार या लढतीत बघायला मिळाले. पाटलीपुत्र क्रीडा संकुलात पार पडलेल्या या झुंजीत अनुपकुमारने तब्बल २२ चढाया केल्या. यातील आठ चढाया यशस्वी ठरल्या. तर १२ चढाया निष्फळ. संपूर्ण सामन्यात बेंगळुरूला अनुपची फक्त दोनवेळाच पकड करता आली, यावरुन अनुपच्या खेळातील सफाई दिसून येते. संघातील अनुपचा सर्वात जवळचा सहकारी राकेशकुमारने पाच चढायांमध्ये तीन गुण मिळवले. बचावात मुम्बासंघ कमी पडतो आहे, हे बेगळुरूविरुद्ध पुन्हा दिसले; पण अनुपच्या चढायांनी वेळ मारून नेली.

No comments:

Post a comment