Wednesday 6 July 2016

लोकसभा, विधानसभा निवडणूक एकाचवेळी?

मेलबोर्न - लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाचवेळी घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने दर्शविली आहे. याबाबत बऱ्याच राजकीय पक्षांमध्ये मतैक्‍य असून, यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी म्हटले आहे. तशी शिफारस देखील त्यांनी कायदा मंत्रालयाकडे केली आहे. दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्यापूर्वी पुरेशी तयारी करावी लागेल, अतिरिक्त इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांची सोय करताना मतदानाच्या तारखांचा ताळमेळ साधावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले. ते येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बोलत होते.

संसदीय समितीकडे आम्ही तसा प्रस्ताव सादर केला असून समितीनेही यावर राजकीय पक्षांमध्ये आणखी चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या प्रक्रियेमध्ये काही राज्यांना मागे ठेवावे लागेल तर काही राज्यांत आधी निवडणुका घ्याव्या लागतील. दरम्यान, ज्या पक्षांनी या दोन्ही निवडणुका सोबत घेण्याची तयारी दर्शविली आहे, त्यांची नावे मात्र आयोगाने अद्याप जाहीर केलेली नाहीत.
ऑस्ट्रेलियन पद्धत
ऑस्ट्रेलियन निवडणूक पद्धतीमधील साधेपणा, पारदर्शकता आणि येथील विविध राजकीय पक्षांमधील सहकार्य पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत, असे झैदी या वेळी म्हणाले. ऑस्ट्रेलियातील मतदान पद्धती आदर्श असल्याने भारतास तिचे अनुकरण करण्यास बराच वाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment