भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावाद, जोडीला जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मकतेने गुरुवारी सलग तिसरा दिवस निर्देशांकांची दोन वर्षांतील सर्वोत्तम तिमाही वाढ भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावाद, जोडीला जागतिक भांडवली बाजारातील सकारात्मकतेने गुरुवारी सलग तिसरा दिवस प्रमुख निर्देशांकांसाठी वाढीचा राहिला. एकाच व्यवहारातील २५९.३३ अंश वाढीने सेन्सेक्सने २७ हजारांनजीक, २६,९९९.७२ चा टप्पा गाठला, तर ८३.७५ अंश वाढीने निफ्टी ८,३०० नजीक, ८,२८७.७५ पर्यंत पोहोचला. गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्स व
निफ्टीने अनुक्रमे २७ हजार व ८,३०० या महत्त्वाच्या पातळ्यांना स्पर्श केला. तर दिवसअखेर दोन्ही निर्देशांकांची बंद पातळी ही गेल्या दोन वर्षांतील सर्वोत्तम तिमाही वाढ नोंदवणारी ठरली आहे. निफ्टीला २०१६ सालात पहिल्यांदाच ८,३०० पल्याड मजल गाठता आली आहे. सेन्सेक्सची गेल्या तीन व्यवहारांतील एकूण वाढ ३४२.६८ अंश राहिली आहे. डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयानेही बाजारातील तेजीच्या उत्साहात भर टाकली. गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होते. बाजारात सुरुवातीपासूनच तेजीचे वातावरण होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि २४ तास दुकाने, मॉल खुले ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या व्यवहारांत केले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर झाल्याने वस्तू व सेवा कर विधेयक मंजुरीबाबतही गुंतवणूकदारांच्या आशा वाढल्या आहेत. बुधवारप्रमाणेच ग्राहकोपयोगी वस्तू, विद्युत उपकरण, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. सेन्सेक्समधील दोन वगळता इतर सर्व २८ कंपन्यांचे समभाग मूल्य वाढले. यामध्ये डॉ. रेड्डीज्, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, भारती एअरटेल हे ३.३८ टक्के वाढीसह आघाडीवर राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.२६ व ०.९४ टक्क्यांनी वाढले. मंगळवारच्या तेजीतील अमेरिकेतील प्रमुख भांडवली बाजारानंतर आशियाई तसेच युरोपीय निर्देशांकांमध्येही गुरुवारी वाढ नोंदली गेली. आशियाई बाजारातील हेंग सेंग, निक्केई आदी जवळपास दोन टक्क्यांची वाढ नोंदवीत होते.Friday, 1 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment